Saturday, February 24, 2018

मुंबई रेल्वे - एक शिक्षक !

मुंबई...आमची मुंबई बरेच काही शिकवून जाते.. हे रेल्वेचे पहा... गाडीत चढलात आणि कितीही गर्दी असली तरी चवथी सीट मिळवणे हे 'छोटया इन्व्हेस्टमेंट' चे बाळकडू इथूनच शिकतो. कारण तीच चवथी सीट नंतर 'तिसरी पूर्ण सीट' होईल या रिटर्नस् ची त्याला अपेक्षा असते.

दुसऱ्याने तुमच्या पायावर पाय दिला असताना त्याच्यवर खेकसणे आणि दुसऱ्याच्या पायावर तुम्ही पाय दिला असताना त्याच्या शिव्या ऐकून घेणे या दोन्ही कला इथेच शिकवल्या जातात.

हल्लीच मी अनुभव घेतला एखाद्याच्या 'फोकस' बद्दल...
एक असामी रोजच्या ठरलेल्या वेळेस जी मिळेल ती गाडी पकडतो. त्याचं वेगळेपण म्हणजे गाडी कोणतीही असेल यांना
दरवाजाच्या जवळ यथेच्छ मांडी घालून बसण्याची जागा कमावणे सहज शक्य होते. पूर्ण डब्याची गर्दी एका बाजूला आणि यांनी मिळवलेली जागा एका बाजूला. एक दोन वेळा नाही.. मी नेहमीच हे पाहिलय.

समय नियोजनाची शिकवण सुध्दा देते रेल्वेच... कोणती गाडी पकडायला किती वाजता घरून निघाले पाहिजे म्हणजे ती मिळेल... गर्दीच्या वेळी किती गाड्या सुटतील तो अंदाज घेऊन योग्य वेळेत नियोजित स्थळी पोहोचणं हे इथे आपोआपच अंगवळणी पडते.

तसे बरेच धडे रोजच गिरवले.. पण मी आपले माझे काही वैयक्तिक अनुभव तुमच्या समोर मांडले... अनेक धडे तर तुम्ही सुध्दा घेतले असतीच.
आठवत असेल एखादा तर लिहावे...!!!

-ग.वि.तळवणेकर




Thursday, October 1, 2015

कोकणातील अनमोल बालपण...!!!!


    ते अनमोल बालपण...मनाच्या कुशीत हळुवार जपून ठेवलेले....आज पुन्हा गवसले जेव्हा हा पेन होल्डर सावंतवाड़ीच्या 'उभा बाजार' मध्ये खेळण्याच्या दुकानात दृष्टीस पडला. कोप-यात धूळ खात पडला होता. सहज नजर गेली. आनंद गगनात मावेनासा झाला.लगेच तो विकत घेतला. पाहताच अवघे बालपण डोळ्यासमोर तरळून गेले. काय लख्ख दिवस होते ते. आता ते दिवस नाही तर त्यांची आठवण म्हणून हा सोबत करील.
     शाळेच्या परीक्षा सुरु असतानाच मनात एक जोश असायचा की... परीक्षा संपू दे... मग धम्माल उडवायची. फ़ुल्टू कोकण...!!! मनात बेत आखणी सुरु... परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की, आमची मुंबईहून गावी बदली केली जायची. आयुष्यातली ती एकच अशी सुखद; एरव्ही बदली म्हटली की धडकीच भरते. 
      क्रिकेट, गोट्या , भोवरे, पतंग जेवढा मुंबईची खेळायची साधने असतील ती जमवायची. वेगळ्या पिशवीत जमेल तेवढे जास्तीचे चेंडू जमवून ठेवणे. सुट्टीतल्या अभ्यासाची वह्या पुस्तके पण (कधीच गावी नाही केला :p )... एक मात्र, त्या वेळी गॉगल किंवा इतर कुठल्याच भंपक गोष्टी नसल्याची मनात सल नसायची. उघडया डोळ्यात सगळे सामावून घेण्याची मजाच निराळी. कायम आठवणीत असते ते (पुसटसे का होईना)..

   

एस.टी. गावाच्या जवळ यायला लागली की मनात वेगळाच आनंद व्हायचा. एकदा घराची वाट दिसली की तो आनंद तर चेह-यावर स्पष्ट दिसायचा.न्यायला आमचे आजोबा ('आजो') आणि काका नेहमी हजर.
त्यांना खूप आनंद नातू/पुतण्या आला त्याचा.... "वा चाकरमानी इले तर"…  
घरात पाऊल टाकताच काकी पाणी घेऊन यायची....आजी जवळ घेऊन विचारपूस करायची.
चहा - भाकरी पुढे करायची. मला मुंबईत चहा कधी आवडायचा नाही, पण आजीने दिलेला चहा क्वचितच नाकारला. भाकरी खाताना घरची म्हैस व्याली याची खबर सगळेच देत. घरात मांजरे आणि बाहेर आमचे घराचे राखणदार (पिंट्या, सुंदर, टिपू, इत्यादी). जोरात ओरडून त्यांना बोलावणे.... त्यांना काही तुकडा टाकून आपली भाकरी संपवणे.

          मग आम्ही 'मुम्बयसून' आणलेला खाऊ सर्वांना देऊन महत्वाच्या मुददयावर येत असू.
गुरे चरायला नेणे(मोकळे स्वछंद भटकायाचा बहाणा). हातात काठी घेऊन चालू पडायचे. आमच्या गुरांवर माझा भारी जीव होता. त्यांची पोटे पूर्ण भरेस्तोवर चरवायचे. आपल्या आवडत्या वासारांची विभागणी करून त्यांना वाढवणे हे इतर उद्योग.      

गुरांना पाण्याला नेणे हा आमच्या एकदम आवडीचा विषय. त्यांनी पाणी पिण्यापेक्षा आम्हाला नदीत पोहायला आणि डुम्बायला मिळत असे!!! बरेचदा म्हशी-रेडयाना कंटाळा येऊन ते पाण्याबाहेर पडत. आम्ही तरीही पाण्यातच!!! (गुरे जाऊ देत....येतील थोड्या वेळाने).... तोपर्यंत पोहायला शिकणे, नदीच्या कडेला असलेल्या दगडांत 'कुर्ल्या', शिंपले, सोबत आणलेल्या जाळ्याने मासे पकडण्याचे लघुउद्योग चालू  असायचे.
मध्यान्ह उलटून गेली तरी आम्ही आलो नाही हे पाहत आजो किंवा काका येत शोधत (दुसऱ्या हातात काठी घेऊन ). आम्ही म्हणू "वायच वेळ...पिशी भरत इली".... ते दिसत नाही हे पाहून अजून अर्धा तास असू पाण्यात (अंगाचा रंग बदलायचा उन्हात). मग सर्व मासे, शिंपले, कुर्ल्या पिशवीत भरून गुरे शोधायला जाणे.... :-)
नदीने मला पोहायला (सुरुवात हात टेकून) आणि धीराने मासे धरायला शिकवले. तिचा मी कायम ऋणी आहे.
  
घरी उकडया तांदळाची पेज आणि परड्यातील भाजी यांचा आस्वाद (सोबत आज काय केले त्या गोष्टी)...चवच वेगळी त्या अमृताची. आमची आजी होतीच "अन्नपूर्णा".... "वायच खा रे… जीव बघा तुमचो कसो झालो तो.." मला आणि छोटयाला उद्देशून. 
          थोडयाच दिवसांत सर्व भावंडे जमायची. आत्या-मामा-काकाची मुले (मायग्या, परसाद, उमो, राको, शिद्धो, अबी, शिल्पा, दर्शा, तृप्ती, पपू, शिल्पा२, शिद्धू) असे घरचे सवंगडी जमत. त्यांना परीक्षा संपली तरी शाळेत जावे लागे मार्क कळेपर्यंत. मग ते मोकळे झाले की सर्व आमच्या घरी बस्तान मांडत बरेच दिवस.सर्वांना या उद्योगांत सामावून घेतले जाई.

         दुपारचा आराम कधीच नाही. कधी जवळच्या जंगलात करवंदे काढायला, कधी उगाच सर्व मिळून सशाचा माग काढणे (काहीच त्यातले जमत नसले तरी)... घरासमोरील जास्वंद आणि जांभळीच्या झाडाखाली विविध  खेळांचे दुकान सुरु. 'उम्या'च्या सुपीक डोक्यातील कल्पनातून नारळाच्या झावळयांचा मांडव करणे. नवीन वासराला तिथे बांधणे. झाडाच्या पाळा-मुळात गिरणीचा खेळ. कधी वनभोजन शेंगदाणे, काजू, चाफरे,जांभळाचे... विकत काहीच नसायचे.. घराच्या कपाटातून काढून लपवून आणायचे.
आम्हाला पत्ते खेळताना काकाने पाहू नये हे आम्ही सांभाळून असू. काका दिसला की सर्व चिड़ीचूप आणि बंद. त्याचे ठाम मत पत्ते न खेळण्याबद्दल.
        नंतर.....आजीची हाक यायची  "गणेसा जेवान वाढलय रे …चला बेगीन"
जेवण आम्ही पकडून आणलेल्या मासे, शिंपले किंवा कुर्ल्यांचे....गोडया माशांची चविष्ट चटणी आजीच बनवू शकते... आमचा विश्वास. आम्ही रोज मासे आणले तरी तेवढ्याच मनापासून बनवायची. पप्पा वैतागत आमच्यावर, तिला त्रास दिल्याबद्दल. मनसोक्त मासे (काट्यासकट) खाऊन आम्ही परत घराबाहेर.
     
        घरासमोरच्या मोठ्या आंब्याच्या (गारपाच्या) सावलीत फांदीवर बसणे...तिथे खूप गप्पा...झाडावर चढ... झोपाळा बांधायचा प्लॅन...सावलीत झोपायचा प्रयत्न.... गवताच्या कुडीत उड़्या मारणे....

          संध्याकाळी चाय-बटर खाऊन पुन्हा गुरे घेऊन जाणे. आमचा रेडा आणि मित्रांच्या रेड्याची छोटीशी झुंज लावून देणे(जीवघेणी कधीच नाही). सोबत क्रिकेट. खेळताना मुंबईचा हिसका दाखवणे. खेळाचे नियम आम्हाला जास्त कसे माहीत आहेत ते वेळोवेळी दाखवणे. दमेपर्यंत खेळ झाला की गुरांना घेऊन परतायचे.
          रात्र तर दिवसापेक्षा रंगतदार, काळोखी आणि शीतल....! आज्याच्या अभूतपूर्व काल्पनिक गोष्टी... जमलेल्या सर्व मुलांकडून शेंगदाणे खुडून घेण्याचे काम करुन घेण्यासाठी गोष्टी. नावे पण  सोपी...'लकू-ठकूची गोष्ट', 'नाम्याची गोष्ट', 'म्हातारीची गोष्ट', इत्यादी.... गोष्ट लांबवणे शिकावे तर आज्याकडून. लकू-ठकू कधी संपतच नसे. ऐकता-ऐकता डोळ्यावर पेंग येत असे. ऐकायची ओढ़ पण असे. कामही चालू असायचे.
          आज्याला कधी कौले साफ़ करताना... तर कधी काकाला शेणाच्या गोवऱ्या टोपलीतून शेतात नेताना आमची मदत लागे. आजा आम्हाला शेवाची पुड़ी देत असे. कधी जत्रेला गेला तर भजी देई.
काका शेतातली रताळ्याची कापे उकडून देई, आंबे-फणस देई.
आम्हाला दिले असले तरी पोरा-थोरानी मिळून खायचे.....

       एप्रिल आणि मे महिना (पर्यायाने उन्हाळा) अशाच सुंदर दिवसांनी संपत येई...आणि पहिल्या पावसाचे वेध लागत...
पहिल्या पावसात ओहोळावर जाऊन चढणीचे मासे उघडया छत्रीत पकडणे हा माझा आणि काकाचा उद्योग.
कुर्ल्या पकडायचा लाकड़ी पिंजरा ('खूनी') घेऊन आम्ही जायचो. मासे आणि कुर्ल्या हमखास मिळतच.
काकाला मस्त जमते ते.....    

नंतर सुट्टीचे काहीच दिवस उरत... पप्पा न्यायला येत...मन एकदम उदास होई.... एक एक क्षण जड होई...मी आज्याच्या बाकडयावर झोपून कौलांकडे पाहत राही...काका म्हणे "झाला हो बघा…गंपू लागलो घटका मोजूक." जायचा दिवस आला की आम्ही कुठेतरी दूर गायब(न जाण्याचा प्लॅन करत).
आजी जायच्या सामानात घावणे आणि चटणी देई...आजा तुळशीकडे आंब्याचे पान ठेवून आमच्या सुखद परतीच्या प्रवासाचे देवाला गा-हाणे सांगे. सर्वजण समजावत की जायचे आता मुंबईला....मी एका वर्षी खूप रडलो होतो.
          जाताना आजी आणि आजो घराच्या बाहर येऊन बसून डोळे पाणावून एकच विचारत … "गणपतीक येतलास मा?"

                                                                       
     - ग. वि. तळवणेकर (मु.पो.पिंगुळी, कुडाळ,सिंधुदुर्ग)        

Saturday, August 10, 2013

ही आहेत माणसे



      बस मधल्या एकदम मागच्या सीटवर त्याच्या एक-दोन वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेला त्यातल्या त्यात नवखा असा बाप... मूल लागलं रडायला, म्हणून त्याला शांत करण्याचा त्याचा अर्थपूर्ण आणि शर्थीचा प्रयत्न... तरीही ते मूल शांत होईना. बापाने आपल्या आरामाच्या सीट ची पर्वा न करता त्याला घेऊन उठला. खिडकीबाहेर बोट दाखवून गाडया-माणसे दाखवली, नंतर तर थेट ड्रायव्हर च्या इथे नेउन गाडी कशी चालवतात ते दाखवले!!!. नाहीतर काही बाप बसून राहतात तिथेच, आपल्या 'सीट' ला सांभाळत आणि चिमुरड्यांना दम-दाटी करीत... पण हा 'खराखुरा मायाळू बाप' होता.

        असाच एक आजचा प्रसंग... श्रावणातला पहिला शनिवार. ११.३० सकाळचा सुमार.. खिडकीत बसून उशिरानेच नाश्ता करत होतो... ऊन होते 'चांगले'... अचानक पावसाने अंधार केला... वारा सुटला सुसाट... कॉलनीच्या मध्य रस्त्यातून वरच्या दिशेने आणि वा-याच्या विरुद्ध एक काटक बाई लगबगीने चालली होती.... तिच्या हातात छत्री होती. पावसाचे टपोरे, भले-मोठे थेंब चालू लागले तिच्या दिशेने... पण तिने छत्री नाही उघडली... तिच्या पायांचा वेग मात्र वाढला, जवळच दिसणा-या दूध केंद्राच्या ओघाने... आडोशाला उभे राहण्याच्या धडपडी साठी... काय असावे कारण?  माझी शंका एकच उत्तर देत होती... त्या सुसाट वा-यात जर छत्री उलटी झाली आणि तीर मोडले तर मग काय?... उगाच नको तो खर्च ओढवेल.... तिच्या त्या छत्रीने हा पावसाळा सुखरूप पार करावा हाच विचार... अजून घरचे बरेच महत्वाचे खर्च असतील डोक्यात.... स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी सुखवस्तू घरातील बाई थाटात छत्री उघडून न भिजता गेली असती. जरी तिची छत्री उलटी झाली तीर मोडले तरी घेऊ शकेल ती दुसरी...
   
  माणसे आहेत अजून सांगण्यासारखी.... आज आठवत नाहीत एवढेच...   पुन्हा कधी सांगेन ...
                                                                                                                  - ग. वि. तळवणेकर

Thursday, August 1, 2013

हा क्षण तुझ्याच नावे अर्पिला मोरया…


पहाटेपासूनच मनाची एक वेगळीच तळमळ सुरू होती… बरेच दिवस काही मनासारखे हातून रेखाटले गेले नव्हते… सकाळचा नाश्ता झाला आणि पायांना म्हटले "चला निघू..." स्टेशनला आलो, एक फ्रेम करून घ्यायची होती. फ्रेम वाल्याकडे जाऊन पाहतो तर त्याचे 'दुकान बंद'. मनात योजून काही करावे आणि ते तसेच घडणे याची शक्यता म्हणजे अगदी दुर्मिळच :( .... पण मनाची समजून घालून निघालो पुढे >>> खांद्यावर असलेल्या bag मध्ये पुस्तक होतेच. मग नेहमीच्या मंदिराच्या मागे असलेल्या लायब्ररीत जाउन पुस्तक बदलून घेतले… लायब्ररी मात्र नेहमी शहाण्या मुलासारखी वेळेवर उघडी असते(रविवार असला तरीही) :) नंतर येऊन मंदिरात मोरयाचे आणि देवीचे दर्शन घेतले... आयुष्य म्हणजे काय याचा कधीच शोध लागत नाही (कितीही प्रयत्न केले तरीही). पण इथे या मंदिरांत आले की मात्र सर्वांचा विसर पडतो.... एक वेगळीच मन:शांती मिळते. देवदर्शन एक कारण असते पण ही मन:शांती 'खूप काही' देऊन जाते. त्या 'खूप काही' मधील हा एक क्षण.... एक वयस्कर असे गृहस्थ तिथे आले. त्यांचे देवदर्शन घेऊन झाले. तसे त्यांनी घरून आणलेली छोटीशी चौरसाकृती चटई अंथरली आणि ध्यानस्थ झाले... असे ध्यान लावून तरी जन्माचे सार्थक होईल ही एक आपली भाबडी आशा... आणि तरीही निरपेक्ष वाटणारी ही मूर्तिमंत व्यक्ती. मला माहीत नाही कुणाचे ध्यान करीत असावी ती असामी... पण एक पुसटशी शंका आपली की नक्कीच मोरयाचे नामस्मरण करीत असतील अशी. आणि हा क्षण टिपण्याचा मोह अनावर झाला... रेषा तेवढ्या clear नसतील पण भाव टिपण्याचा हा जलद प्रयत्न... हा क्षण तुझ्याच नावे अर्पिला मोरया... _/\_

Sunday, November 25, 2012

पण त्या 'पणत्या' होत्या...


या वर्षी काही नवीन करावे म्हणून या रंगवल्या... वेगळा अनुभव... मामा मामी आली त्यांना भेट दिल्या ... :)
माझा ऑफिस च्या डेस्क वरील बोर्ड चा थोडा सा 'चित्रोपयोग' .... गंमत म्हणजे.. हवे तेव्हा ते पुसून .... नवे चित्र चितारता येते .... मज्ज्जा ... दूरच्या रानातल्या ..... बकुळीच्यातळी... त्या तळ्याकाठी ... स्वपरीक्षण करत असलेला तो..

Friday, July 27, 2012

Shoes - sketched on the day of 'London olympics' opening @home but :D


काय विषय निवडायचा .... काय विषय निवडायचा .... तेवढ्यात दिसले ते विशाल चे शूज... मग काय... London Olympics चा मुहूर्त होता... :)