बस मधल्या एकदम मागच्या सीटवर त्याच्या एक-दोन वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेला त्यातल्या त्यात नवखा असा बाप... मूल लागलं रडायला, म्हणून त्याला शांत करण्याचा त्याचा अर्थपूर्ण आणि शर्थीचा प्रयत्न... तरीही ते मूल शांत होईना. बापाने आपल्या आरामाच्या सीट ची पर्वा न करता त्याला घेऊन उठला. खिडकीबाहेर बोट दाखवून गाडया-माणसे दाखवली, नंतर तर थेट ड्रायव्हर च्या इथे नेउन गाडी कशी चालवतात ते दाखवले!!!. नाहीतर काही बाप बसून राहतात तिथेच, आपल्या 'सीट' ला सांभाळत आणि चिमुरड्यांना दम-दाटी करीत... पण हा 'खराखुरा मायाळू बाप' होता.
असाच एक आजचा प्रसंग... श्रावणातला पहिला शनिवार. ११.३० सकाळचा सुमार.. खिडकीत बसून उशिरानेच नाश्ता करत होतो... ऊन होते 'चांगले'... अचानक पावसाने अंधार केला... वारा सुटला सुसाट... कॉलनीच्या मध्य रस्त्यातून वरच्या दिशेने आणि वा-याच्या विरुद्ध एक काटक बाई लगबगीने चालली होती.... तिच्या हातात छत्री होती. पावसाचे टपोरे, भले-मोठे थेंब चालू लागले तिच्या दिशेने... पण तिने छत्री नाही उघडली... तिच्या पायांचा वेग मात्र वाढला, जवळच दिसणा-या दूध केंद्राच्या ओघाने... आडोशाला उभे राहण्याच्या धडपडी साठी... काय असावे कारण? माझी शंका एकच उत्तर देत होती... त्या सुसाट वा-यात जर छत्री उलटी झाली आणि तीर मोडले तर मग काय?... उगाच नको तो खर्च ओढवेल.... तिच्या त्या छत्रीने हा पावसाळा सुखरूप पार करावा हाच विचार... अजून घरचे बरेच महत्वाचे खर्च असतील डोक्यात.... स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी सुखवस्तू घरातील बाई थाटात छत्री उघडून न भिजता गेली असती. जरी तिची छत्री उलटी झाली तीर मोडले तरी घेऊ शकेल ती दुसरी...
माणसे आहेत अजून सांगण्यासारखी.... आज आठवत नाहीत एवढेच... पुन्हा कधी सांगेन ...
- ग. वि. तळवणेकर

