Saturday, August 10, 2013

ही आहेत माणसे



      बस मधल्या एकदम मागच्या सीटवर त्याच्या एक-दोन वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेला त्यातल्या त्यात नवखा असा बाप... मूल लागलं रडायला, म्हणून त्याला शांत करण्याचा त्याचा अर्थपूर्ण आणि शर्थीचा प्रयत्न... तरीही ते मूल शांत होईना. बापाने आपल्या आरामाच्या सीट ची पर्वा न करता त्याला घेऊन उठला. खिडकीबाहेर बोट दाखवून गाडया-माणसे दाखवली, नंतर तर थेट ड्रायव्हर च्या इथे नेउन गाडी कशी चालवतात ते दाखवले!!!. नाहीतर काही बाप बसून राहतात तिथेच, आपल्या 'सीट' ला सांभाळत आणि चिमुरड्यांना दम-दाटी करीत... पण हा 'खराखुरा मायाळू बाप' होता.

        असाच एक आजचा प्रसंग... श्रावणातला पहिला शनिवार. ११.३० सकाळचा सुमार.. खिडकीत बसून उशिरानेच नाश्ता करत होतो... ऊन होते 'चांगले'... अचानक पावसाने अंधार केला... वारा सुटला सुसाट... कॉलनीच्या मध्य रस्त्यातून वरच्या दिशेने आणि वा-याच्या विरुद्ध एक काटक बाई लगबगीने चालली होती.... तिच्या हातात छत्री होती. पावसाचे टपोरे, भले-मोठे थेंब चालू लागले तिच्या दिशेने... पण तिने छत्री नाही उघडली... तिच्या पायांचा वेग मात्र वाढला, जवळच दिसणा-या दूध केंद्राच्या ओघाने... आडोशाला उभे राहण्याच्या धडपडी साठी... काय असावे कारण?  माझी शंका एकच उत्तर देत होती... त्या सुसाट वा-यात जर छत्री उलटी झाली आणि तीर मोडले तर मग काय?... उगाच नको तो खर्च ओढवेल.... तिच्या त्या छत्रीने हा पावसाळा सुखरूप पार करावा हाच विचार... अजून घरचे बरेच महत्वाचे खर्च असतील डोक्यात.... स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी सुखवस्तू घरातील बाई थाटात छत्री उघडून न भिजता गेली असती. जरी तिची छत्री उलटी झाली तीर मोडले तरी घेऊ शकेल ती दुसरी...
   
  माणसे आहेत अजून सांगण्यासारखी.... आज आठवत नाहीत एवढेच...   पुन्हा कधी सांगेन ...
                                                                                                                  - ग. वि. तळवणेकर

Thursday, August 1, 2013

हा क्षण तुझ्याच नावे अर्पिला मोरया…


पहाटेपासूनच मनाची एक वेगळीच तळमळ सुरू होती… बरेच दिवस काही मनासारखे हातून रेखाटले गेले नव्हते… सकाळचा नाश्ता झाला आणि पायांना म्हटले "चला निघू..." स्टेशनला आलो, एक फ्रेम करून घ्यायची होती. फ्रेम वाल्याकडे जाऊन पाहतो तर त्याचे 'दुकान बंद'. मनात योजून काही करावे आणि ते तसेच घडणे याची शक्यता म्हणजे अगदी दुर्मिळच :( .... पण मनाची समजून घालून निघालो पुढे >>> खांद्यावर असलेल्या bag मध्ये पुस्तक होतेच. मग नेहमीच्या मंदिराच्या मागे असलेल्या लायब्ररीत जाउन पुस्तक बदलून घेतले… लायब्ररी मात्र नेहमी शहाण्या मुलासारखी वेळेवर उघडी असते(रविवार असला तरीही) :) नंतर येऊन मंदिरात मोरयाचे आणि देवीचे दर्शन घेतले... आयुष्य म्हणजे काय याचा कधीच शोध लागत नाही (कितीही प्रयत्न केले तरीही). पण इथे या मंदिरांत आले की मात्र सर्वांचा विसर पडतो.... एक वेगळीच मन:शांती मिळते. देवदर्शन एक कारण असते पण ही मन:शांती 'खूप काही' देऊन जाते. त्या 'खूप काही' मधील हा एक क्षण.... एक वयस्कर असे गृहस्थ तिथे आले. त्यांचे देवदर्शन घेऊन झाले. तसे त्यांनी घरून आणलेली छोटीशी चौरसाकृती चटई अंथरली आणि ध्यानस्थ झाले... असे ध्यान लावून तरी जन्माचे सार्थक होईल ही एक आपली भाबडी आशा... आणि तरीही निरपेक्ष वाटणारी ही मूर्तिमंत व्यक्ती. मला माहीत नाही कुणाचे ध्यान करीत असावी ती असामी... पण एक पुसटशी शंका आपली की नक्कीच मोरयाचे नामस्मरण करीत असतील अशी. आणि हा क्षण टिपण्याचा मोह अनावर झाला... रेषा तेवढ्या clear नसतील पण भाव टिपण्याचा हा जलद प्रयत्न... हा क्षण तुझ्याच नावे अर्पिला मोरया... _/\_